माझा देश कोणता? तेवढं सांगा ना साहेब???

माझा देश कोणता? तेवढं सांगा ना साहेब???

गावात जयंती केली,म्हणून अख्खा गाव पेटवला साहेब..
माझ्या म्हातारीचा डोळा फोडला,
बायको आगीत पेटली..
माझं घर जळालं...
घराचं काय?आज-उद्या उभं राहिल......

पण माझा देश कोणता? तेवढं सांगा ना साहेब????

बाबासाहेब म्हणाले होते,"शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध आहे,ज्याला मिळालं तो डरकळल्याशिवाय राहणार नाही"
म्हणून पोराला शाळेत घातलं...
काल धान्याच्या गोणी सकट पेटवलं पोराला.....
जळलेल्या कातडीचा ठसका अजून बसतोय....
माझाच हुंदका माझ्या गळ्यात अडकतोय....
यातून ही कसाबसा सावरेल....

पण माझा देश कोणता?तेवढं सांगा ना साहेब????

बांधवांच्या प्रेताची राख झालीय...
त्यांना वाचवताना मी ही भाजलोय.....
कालपासून पाण्याचा थेंब नाही...
निपचित पडलोय वडाच्या झाडाखाली.....
बेशुद्ध होतो,तेवढ्यात गिधाडानं चोच मारली.....
तेव्हा शुद्धीवर आलो....
भर उन्हात गिधाडांनी टरारून फाडलं......
मरणाचं दुःख नाही......

पण माझा देश कोणता? तेवढं सांगा ना साहेब???????????

Comments