आपल्या मर्यादा लक्षात आल्या की, व्यक्त केलेला रागही मला दांभिक वाटायला लागलाय हल्ली. आता फेसबुक वाल्यानं अॅंग्री व्हायचं बटन दिलंय !!. तो एक आपल्या उत्साहाचा काळ होता, तेंव्हा तावातावानं - फणफणत आक्रस्ताळा वाटण्यापर्यंत बोललो. टिचभर का होईना आक्रोशासाठी थोडीशी जागा उपलब्ध करून दिली होती, केशव वाघमारे सारख्या हळव्या भावानं.
नितीन आगे प्रकरणानंतरचं ते लोकांसाठी आंदोलन होतं, माझ्यासाठी पुस्तकं सोडून काहीतरी समजून घ्यायचा काळ होता.
नितीन आगे अगोदरही दलीतांनी मारलं जाण्याची उज्ज्वली परंपरा आहेच या पुरोगामी महाराष्ट्रात. हा महान वारकरी संप्रदाय आणिक महानुभव आणिक काय काय.. वाहतं का पाणी असेना साला गाळ तर वाहून आणतंयच सोबत.
आगे प्रकरणाआधी माझा संबंध फक्त बातम्या वाचनं आणि
1. 'कुरूंदकर व्हाया मोरे ब्रदर्स ते धर्माधिकार' सांगणारा किंवा
2. कडंकडंनं गांधी-आंबेडकर घेणारा कुणी सात्विक मितभाषी किंवा
3.पोरकट स्त्रीवादी अभ्यासू व्यक्तीच्या "अरे तुम्ही कशातही जात आणता राव'' या कॉमन वाक्याला खोडण्यात वेळ जायचा. ते सगळं अर्थहिनच होतं म्हणा..
त्या आंदोलनासोबत जाताना गावोगावातले जुने पॅंथरचे कार्यकर्तेही भेटले, ज्यांची नावं कुणाला माहित नसतात असे. बुधवाडे (महारवस्ती), मांगवाड्या, पारधी वस्त्यांवरचं उन्हातान्हातलं प्रेम अनुभवलं, आपला सगळं पुस्तकी डीकास्ट वैगेरे होणं किंवा ढसाळ वाचून उर बडवून घेणं किती नकली आणि बंगई लेखकांसारखं आहे, असं तीव्रतेनं आंदोलनादरम्यान वाटत गेलं.
जातीच्या दाखल्यावर भटके पण सेटल दुसऱ्या पिढीतले असल्यामुळे, मध्यम जातीय लोकांसारखा चवीपुरता बहुजनवाद आपल्यात होता, आणि आपल्याला कधीकधी राजेही व्हायची हुकी यायची.. अधेमधे सुफीगाणे आणि शिरखुर्म्यापुरता मुसलमानं दोस्त.. असं काहीबाही मला आरश्यात पाहिल्यासारखं त्या आंदोलनातून तीव्रतेने जाणवत गेलं.
केशव वाघमारे नसता तर मी स्वच्छपणे स्वताला पाहूच शकलो नसतो. ज्या त्या गावातल्या बुद्धविहारात किंवा समाज मंदीराच्या अंगणात रात्री आंदोलनातील लोकं झोपायचे. एरव्ही चांदण्या दररोज मुताल्यागत कवितेत वापरणारा मी, पहिल्यांदा आभाळ उरावर घेणं काय असतंय थोडासा अंदाज आलता. दलीत साहित्य वाचून उसणवारं बोलनं एकीकडं आणि बुधवाड्यातला चंद्र कधीच रोमॅन्टीक नसून तो वाकुल्या दाखवणारा का असतो, हे थोडबहोत कळालं.
आपला परिवेश तो पर्यंत फक्त अंगणातल्या जाईजुईला मोटरनं पाणी घालणाऱ्या मास्तर कॉलनीतला होता, हे कबूलचंये की मला...
बाकी मी मोक्कार रानवने धुडांळले होते. पण ते सगळं कॉन्व्हेन्टमधल्या पोराला गाथासप्तशती समजून सांगण्यासारखा उसणवारा प्रयत्न होता.
खेड्यापाड्यात आम्ही जिथं जात होतो, तिथं रस्तेही गावाबाहेरून होते बहुतांश... समाजमंदीरातला आंबेडकरांचा पुतळा पाहत काहीबाही डोक्यात सुरू व्हायचं. गावातल्या मुख्य भागातून किर्तनाचे किंवा अंभगाच्या सिड्या टाकलेल्या भोंग्यातले आवाज यायचे. दुपारी एका खर्ड्याच्या अलीकडे दुष्काळी पट्यातल्या खेड्यातल्या समाजमंदीरात आम्ही जेवणासाठी थांबलो, तेंव्हा तीथं एक बातमी कळाली की, गावकऱ्यांनी जमीनीच्या हक्कावरून पारध्यांची आख्खी वस्तीच जाळून टाकली होती... तो कहरच होता. त्याची सिंगल कॉलम बातमीही नव्हती कुठे म्हणे.. हा सगळा प्रकार पाह्यल्यावर मला बुकाअबीर-जमीन-जुमला-शेतशिवार-भावकीगावकीवाल्या- आतापर्यंत मी वाचलेल्या ग्रामीण कविता मला बेंदाडासारख्या वाटून गेल्या..
खर्ड्यात आलो , भाषणं झाली लोकांची. नितीन आगेचं घर बघितलं, कुण्या वाड्यातल्या न्हानीघरा एवढं घरं असंल. तेही गावच्या बाहेरच्या टेकडीवर... त्याची शाळा पाहिली , फुले शाहू आंबडेकरांचे रेखीव चित्र असलेली.. त्याला कुठुन मारत नेलं त्या रस्त्यानंही चाललो, त्याला मरेपर्यंत मारत एका वीटभट्टीवर नेलं होतं म्हणे, त्याला मारण्याचं वर्णनं करू शकतं नाही. त्याच्या आत गरम सळ्या टाकल्या होत्या मागच्या बाजूनं.. एवढं कळालं होतं.
मी बेहद बधीर झालो. फकाट डोंगरावरून परत खाली आलो. कुसळ डोळ्यात रूतु लागलं माझ्या.. कवळं पोरगं, काय तर एका पोरीला बोललं होतं, त्याला बोलताना कुणीतरी पाहिलं होतं.
बाकी प्रकरणात काय झालं, आरोपी बिरोपी, भाषण, चार्जसिट, निळे नेते, पांढरे नेते येतं होते, नितीनच्या बापाला मदत आली, तीही कुणीतरी नंतर लुटल्याच कळालं.. मध्ये फॅन्ड्री सिनेमाही येऊन गेला बहुतेक.. नगरच्या लोकांना हे काही नवीन नव्हतं म्हणे.. त्याला न्यायबिय मिळाला नाही, ते लोकं सुटले.. सतिश वाघमारे गुर्जींनी भोतमांगे गेल्यावर त्याच्या चेहऱ्यावरची हतबलता एका पोस्टमधून मांडली होती, ती गुर्जीची अस्वस्थता मला थोडीबहोत कळाली, असं म्हणेन मी.
न्यायदेवता, लोकशाही किंवा साहित्यबिहित्यावर अपार श्रद्धा असणाऱ्या गोड गळ्याच्या लोकांच्या ''कशातही जात आणता राव तुम्ही '' या वाक्याचं नेमकं काय करायचं हे मला माहित नाही.
मधे एका टुकार न्युज चॅनेलला मी काम केलं. तेंव्हा होतो-नव्हतो तेवढा बोथट होतं गेलो. दररोज दुष्काळ आणि दलीत अत्याचाराच्या बातम्या करत होतो. कोडगा झालो होतो मी. जेवढ रेटता येईल तेवढं रेटत होतो तिथे..
निरंजन टकलेंची आता गाजत असलेली स्टोरी.. जस्टीस मेला काय- मारला गेला काय- आणि नितीन आगे प्रकरणात लोकं सटुले काय -अन् कोपर्डी प्रकरणात झालं काय- हे सगळ एका रेषेत बसवण्याची आपल्यात कुवत नाहीये, हे आपल्याला कबूलच आहे.
मी पोस्टींना लाईक करत सुटणार आहे, बाकी कुणी हाक दिली तर जाऊ की, आपलेही हात दगडाखालीयेत. साखऱ्या-पावडरात-तेल-पाण्यात कवी बेजार आहे. मुळात कवी नालायक आहे, हे बेहद कबूल.. आपल्याला राग येत नसून, आपल्याकडं अॅंग्रीचं फेसबुक बटन आहे भावा. बाकी प्रत्येकाला आपला खुंटा रोवायचा आहे, प्रसवत राहणं नितांत आवश्यक तमामांसाठी....
Kunal Gaikwad
Comments
Post a Comment