आपण लहानपणापासून ऐकत आलोय, बोलत आलोय, की मुंबई कधीच थांबत नाही, मुंबई कधीच झोपत नाही. मुंबई-पुणे किंवा मुंबई-दिल्लीच्या वादात हे वाक्य आपलं ब्रह्मास्त्र असतं.
बॉंबस्फोट असो, तुफानी पाऊस असो, बंद असो किंवा संप असो, मुंबईकर थांबला नाही. पण...
आज परेल ब्रिजवर चेंगराचेंगरी झाली, तेव्हा मात्र तू थोडा वेळ थांबायला हवं होतंस. 'जल्दी चलो' असं म्हणण्यापूर्वी तू थोडं थांबून गर्दीचा अंदाज घ्यायला हवा होतास.
ब्रिज छोटा... मान्य, प्लॅटफॉर्म छोटे... मान्य, लोकसंख्या अफाट... मान्य, रेल्वे प्रशासन... ढीम्म मान्य, सरकार निकामी... मान्य... पण आज तू स्वत:ला थोडं थांबवलं असतं, पुढच्याला धक्का दिला नसता, तर २२ जीव ( २२ परिवार ) वाचले असते, हे नक्की.
बुलेट ट्रेन स्वस्त का महाग, ते ठरवायला तू समर्थ आहेस, पण आपला जीव स्वस्त की महाग, हे ठरवायला तू थोडं थांबायला हवं होतंस.
पुढच्या वेळी 'जल्दी चलो', 'अंदर खाली है' असं म्हणण्यापूर्वी, परेलचा तो ब्रिज चढण्यापूर्वी, *मुंबईकरा... तू थोडं थांबायला हवं !*
Comments
Post a Comment