आजच्या स्त्रियांनी शिक्षणाच्या अधिकाराचा वापर करीत स्वतः ची प्रगती करून घेतलेली आहे. परंतु आजची स्त्री खरच प्रगत झाली आहे असे म्हणता येईल का? कारण कितीही उच्चशिक्षित स्त्री असो तिच्यावर पारंपारिक विचारांचा पगडा असतोच. मग तो योग्य कि अयोग्य हे ठरवण्याची विचारक्षमता असतानाही बुद्धी गहाण ठेवून स्वतः ला संस्कारी हा लेबल लावून घेण्याचा प्रयत्न कसोशीने केला जातो.
पूर्वीपासून चालत आलेल्या प्रथा -परंपरा यामागची कारण शोधण्याची आवश्यकता वाटत नाही. मग ते मनाला पटत असो वा नसो.
दसर्याच्या निम्मित्ताने स्वच्छता साफसफाई करणे चांगले.परंतु घरातील अगदी चिंदीसुद्धा साफ करण्याचा अतिरेक केला जातो. वर्षाची सफाई एकदाच का? वरचेवर हे सफाई केली गेली तर घर स्वच्छ राहणार नाही का? भरलेले डब्बे रिकामे करून संपूर्ण घरभर पसारा करून एकदाच साफ करणे. मग डब्बा रिकामा झाला कि लगेच स्वच्छ केला तर वर्षातून कितीवेळा तो डब्बा घासून निघेल? पांघरण्याच्या चादरीसुद्धा वर्षातून एकदाच! माळ्याची सफाईपण तेच.
काहीजनितर अगदी धुतलेले कपडेसुद्धा !!कधीच वापरत नसलेले ठेवणीतले भांडी जे फक्त वर्षातून दसर्यालाच घासण्यासाठी बाहेर निघतात !!! हा अतिरेक वाटत नाही का ? हे अवडंबर कशाला? फक्त सणाचा संस्कार म्हणून हि स्वच्छता कि सफाई व्हावी म्हणून हि स्वच्छता ?
दहा-पंधरा दिवस या स्वच्छतेत आणि नंतर परत नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास. किती पुरुष हे उपवास करतात? परंतु आमची भारतीय स्त्री हि जेवढी धार्मिक तेवढी ती संस्कारी हे जणू समीकरणच झाले आहे. त्यात चप्पल सोडून स्वतः ला वेदना पोचवून देवीला प्रसन्न करून घेण्याचे प्रकार. आजकाल तर याचा अतिरेकच झाला आहे. पायी चालत जाण्याचा जणू नवा ट्रेडच चालू झाला आहे. भक्तांसाठी जागोजागी अन्नछत्र करून पुण्य पदरी पडून घेण्याचे कार्य करणारे अनेक कार्यकर्ते सापडतील.परंतु उघड्यावर पडलेल्या अनाथांना आसरा देण्यास कोणी पुढे येत नाही. अशावेळेस नातेवाईकही आपले अंग काढून घेताना दिसतात.
ड्रेसकोडचे काटेकोरपणे शिष्टाचार पाळणारी इंग्रंजी शाळेतूनसुद्धा अशा प्रकारावर आक्षेप घेतला जात नाही. शाळेतूनच गणपती बसवणे, दहीहंडी, एकादशी वारी, दांडिया असे धार्मिक संस्कार केले जातात. कदाचित याला खतपाणी घालण्यासाठीच विध्यार्थानी बूट नाही घातले तरी त्याला विरोध करून हि अंधश्रद्धा असल्याचे समजावून सांगण्याची आवश्यकता वाटत नसावी.
आजचे विध्यार्थी अशा वातावरणात घडत असताना कसा वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण व्हावा?
स्त्रियांना माणूस म्हणून स्वतंत्र विचार करण्याचा अधिकार संविधानाने दिला. परंतु ज्या पुराणाने स्त्रीयांना गुलाम आणि दासी बनवले त्याच पुराणातील संस्काराचे पालन करण्यात आजची स्त्री धन्यता मानते!! ज्या सावित्रीने सहन केलेल्या शेणाचे गोळे,चिखल आणि दगडाचे घाव यामुळे आज शिक्षित आहे तीच्या कार्याची किंमत या पोथीपुराणात अडकलेल्या आणि बहुतांश उच्च पदावर पोचलेल्या स्त्रियांनाही नाही. हि फार फार मोठी शोकांतिका आहे.
अगदी वटपौर्णिमेला शहरी स्त्रियाही वडाचे झाड नाही तर त्याच्या फांदिचीतरी नवर्यासाठी पूजा करून उपवास करतील . सात जन्म हाच पती मिळावा म्हणून. किती नवरे बायकोसाठी हा उपवास करतात? भारतीय संस्कृतीप्रमाणे नवरा हा बायकोपेक्षा मोठा असला पाहिजे. म्हणजे यानियमाप्रमाणे नवरा आधी मेला पाहिजे पुढच्या जन्मी मिळण्यासाठी ! मग हे कोडेच झाले ! हे वृत नवर्याच्या आयुष्यासाठी कि ....
असला सारासार विचार केला जात नाही. प्रथा चालत आलेल्या आहेत आणि त्याचे आपण पालन करायचे. बस्स! आणि या वृतवैकल्याचे ओझे हे स्त्रीयाच्याच डोक्यावर आहे. आजची स्त्री हि फक्त राहानिमानाने आधुनिक होत चाललेली आहे. पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करून आधुनिक होत आहे. आधुनिक तंत्रज्ञाचा वापर करत असताना प्रगत विचारांचीही जोपासना केली पाहिजे. सत्यता शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरच आजची स्त्री खरच प्रगत म्हणता येईल. फक्त राहानिमानाने आधुनिक न होता विचाराने आधुनिक झाले पाहिजे.
मार्गशीष महिन्यातील व्रत्त न चुकता करतील . व्रत्त केले नाही तर कथेत सांगितल्याप्रमाणे आपले कल्याण होणार नाही. हे मनावर बिम्बवलेले भीतीयुक्त संस्कार. परंतु काहीच न करता फक्त व्रताने उपास-तापास करून कसे कल्याण होणार? कित्येक वर्षापासून हे व्रत करणाऱ्या शेतकर्याची बायको विधवा का होते? का तिच्या घरात धनधान्याच्या राशी लागल्या नाहीत? का दुष्काळच्या झळा तीच्या कुटुंबाला होरपळून काढत आहेत? का काहीतरी चमत्कार त्या कथेप्रमाणे प्रत्यक्षात होत नाही आणि सार्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत नाही?
ज्या मासिक पाळीमुळे मातृत्व प्राप्त होवून स्त्रियाचे स्त्रीत्व पूर्णत्वाला येते . मग हि मासिक पाळी अशुभ कशी ? त्या निसर्गनियमाला स्त्रीच अशुभ मानून त्याकाळात स्वतः ला सर्व शुभ कार्यापासून अलिप्त ठेवते. इथे विज्ञानाचा अभ्यास करणारी स्त्रीहि अपवाद ठरू नये!
निपुत्रिक स्त्रियांना, विधवांना शुभ कार्यक्रमात येण्यास बंदी हे असले प्रकार अजूनही होतात. इथे एक प्रकारे स्त्रीच स्त्रीचा छळ करीत असते. अथवा तशी मानसिकता अशा स्त्रियांमध्ये निर्माण होते आजूबाजूच्या स्त्रियांच्या वागणुकीमुळे. मग या स्त्रिया स्वतः ला अलिप्त ठेवतात नशिबाचे भोग म्हणून. एक मानसिक कचुम्बना सहन करीत. हि मानसिकता बदलली पाहिजे. इथे आधुनिक व्हा.
बुरसटलेल्या विचाराचे डंख मारण्याएवजी ,अशा स्त्रियांना मानसिक आधार द्या.
सर्व धार्मिक कर्मकांड करणारी आणि स्वतः च्या सासू-सासर्यांना नीट न सांभाळणारी ,आपल्या कुटुंबियांशी तोडून वागणारी स्त्री संस्कारी होवू शकेल का? परंतु असले धार्मिक कार्य न करता आपल्या कुटुंबियांची व्यवस्थित काळजी घेणारी स्त्री संस्कारी नाही म्हणता येईल का?
आज हा विरोधाभास प्रकर्षाने जाणवतो. स्वतः च्या कुटुंबियांची अवहेलना करून देवदेव करणाऱ्या स्त्रिया पदरी पुण्य बांधून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात.परंतु खरे पुण्याचे कर्म हे काय आहे याचाच यांना विसर पडतो आहे.
कडक उपासतापास करून फक्त शरीराची हानी होणार आहे आणि चाळीशीत पुढे शरीर कमजोर होवून विविध रोगांना आमंत्रण देते. अशाने देविदेवता प्रसन्न होणार नाहीत तर असल्या प्रकारमुळे पुढची पिढीही अंधश्रद्ध बनत जाते हा एक धोका असतो.कारण हि संस्काराची शिदोरी अशीच पुढे जाणार असते.
एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकते.परंतु फक्त शिकणे म्हणजे साक्षर होणे झाले. आता फक्त साक्षर न होता सारासार विचार करून सत्याचा शोध घेतला पाहिजे. आपले कल्याण कशाने होणार हा विचार केला पाहिजे. अंधश्रद्धेचे जाळे तोडले पाहिजे.
विचार तर कराल ?
Comments
Post a Comment