*मोदींसाहेब, आम्हाला शांतपणे तरी जगू द्या !*
येडं झालो आम्ही, ऐकून तुमचं भाषण |
दीड लाख येतील खात्यात अन घरात आयते राशन |
स्वस्त होईल सिलेंडर अशा लय झाल्या गप्पा |
पुरतं फसलो आम्ही कारण तुम्ही मारल्या थापा|
डोक्यातला प्रकाश अन भारताचा विकास,
झोपेतच का होईना, पण स्वप्नात तरी बघू द्या|
*आणि आमचंच आयुष्य आम्हाला मोदींसाहेब,*
*किमान शांतपणे तरी जगू द्या ||*
प्रश्न पडला मला, फुगवून फुगवून छाती,
छप्पन इंच होतेच कशी ?
एका चहावाल्यावर विश्वास ठेवला म्हणून,
फुटला कप अन हातात आली मोकळीच बशी|
"मेक इन इंडिया" करतो सांगत,
अखखं जग फुकट फिरून घेतलं |
तुम्हाला माहीत आहे का ?
तुमच्या माघारीच तुमच्या सहकाऱ्यांनी,
हवं तेवढं माप भरून घेतलं |
भ्रष्टाचार मुक्त भारताच्या स्वप्नांची नाव बुडत चालली,
तिला गटांगळ्या खात तरी पाण्यावर तगू द्या |
*आणि आमचंच आयुष्य आम्हाला मोदींसाहेब,*
*किमान शांतपणे तरी जगू द्या ||*
काळा पैसा परत आणू म्हणत,
नोटबंदीत सर्वसामान्यांना फसवलं |
महागाईचे चिमटे काढत मात्र,
रडकुंडीला आणून खोटं खोटं हसवलं |
खोटं तरी किती बोलावं,
यातून बोलणारा स्वतः तरी काही शिकतो का ?
मला सांगा मित्रहो तुम्हीच आता,
M. A झालेला तरुण कधी ठेल्यावर चहा विकतो का ?
शेवटी दहा लाखाचा कोट असतो तरी कसा ?
आम्हाला पण तो एकदा तरी बघू द्या |
*आणि आमचंच आयुष्य आम्हाला मोदींसाहेब,*
*किमान शांतपणे तरी जगू द्या ||*
बोलाचीच कढी अन बोलाच्याच भातामुळं,
खरं वास्तव मात्र कुठंच दिसत नाही |
पॅनकार्ड मेलं पैशाविनाच आता,
आधारला जगण्याची लिंक मात्र बसत नाही |
योजनांचा कोरडा पाऊस पाडून,
माणसांच्या शेतीत पिकाला बहर कधी येतो का ?
माणसातील माणुसकीच मातीत मिळवून,
देशाचा विकास कधी होतो का ?
खूप झालं आता, शेवटी असंच म्हणावं लागेल,
स्वच्छ भारताच्या शौचालयात बसून....
स्वाभिमानाने तरी निवांत हगु द्या |
*आणि आमचंच आयुष्य आम्हाला मोदींसाहेब,*
*किमान शांतपणे तरी जगू द्या ||*
*कवी: डॉ. शांताराम कारंडे*
Comments
Post a Comment